तीन हजारांवर लाडक्या बहिणींना धक्का; अर्ज केले नामंजूर, जिल्ह्यात चार लाख ८४ हजार महिला लाभार्थी
Ladki Bahin scheme update 2025
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये लाभार्थींची संख्या चार लाख ८४ हजार ६१४ वर पोहोचली आहे. मात्र, या योजनेंतर्गत काही महिलांचे अर्ज विविध कारणांनी नामंजूर करण्यात आले असून, त्यामुळे ३ हजार १७८ महिलांना अपेक्षाभंगाचा सामना करावा लागला आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. महिला व बालकल्याण मंत्री तसेच अर्थमंत्र्यांनी याबाबत अनेक प्रकारची माहिती दिली असून, त्यामुळे बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणुकीपूर्वी सरकारकडून लाभार्थींच्या खात्यावर दरमहा २ हजार १०० रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता दोन महिने उलटून गेले तरी त्यांच्या खात्यात केवळ १ हजार ५०० रुपये जमा होत असल्याचे दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेत काही धनदांडग्या व्यक्तींनीही लाभ घेतला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांवर अंकुश ठेवण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाल्या आहेत. यामुळे पात्र लाभार्थी महिलांमध्ये चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात १५ जानेवारीपर्यंत एकूण पाच लाख १९ हजार ३९५ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी २५ हजार ७६६ अर्ज तात्पुरते मंजूर करण्यात आले. त्यामुळे लाभार्थींची एकूण संख्या चार लाख ८४ हजार ६१४ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे १ हजार ८०४ अर्ज तात्पुरते नामंजूर करण्यात आले असून, ३ हजार १७८ अर्ज कायमस्वरूपी नामंजूर करण्यात आले आहेत.
अर्ज मागे घेण्यासाठी फक्त एक फोन कॉल
सध्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थींनी मानधनाचा हक्क सोडावा, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र, त्याला जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कामठी तालुक्यातून फक्त एका महिलेने यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर मात्र, एकही अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न झालेला नाही.
भिवापूर तालुक्यात सर्वात कमी लाभार्थी
भिवापूर तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी सर्वात कमी आहेत. आतापर्यंत या तालुक्यात चार हजार ९११ अर्ज आले असून, त्यापैकी ४ हजार ४८२ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ९९ अर्ज कायमस्वरूपी नामंजूर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक अर्ज आले असून, त्यांची संख्या तीन लाख ३७ हजार ९९८ इतकी आहे. यातील ३ लाख १३ हजार ९८१ अर्ज मंजूर झाले आहेत.
नागपूर ग्रामीणमध्ये २ हजारांहून अधिक अर्ज नामंजूर
नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक अर्ज आले असले तरी त्यातील २ हजार १७६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ही संख्या इतर १२ तालुक्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. कळमेश्वर तालुक्यात केवळ १२ अर्ज नामंजूर झाले आहेत, तर इतर १२ तालुक्यांमध्ये एकूण ९०९ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.