‘युवा कार्य प्रशिक्षण’ अंतर्गत सुरु झाली शिक्षकांची नियुक्ती, असा करा अर्ज !

Yuva Karya Prashikshan Shikshak Bharti


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. रिक्त शिक्षक पदांवर ही नियुक्ती देण्यात येत आहे. डीएड, बीएड झालेल्या उमेदवारांना यात संधी देण्यात येत आहे. यामुळे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळले जाणार असून सहा महिने कालावधीचा शिक्षक म्हणून अनुभव सुद्धा उमेदवारांना मिळणार आहे. मालवण पंचायत समितीने हा प्रयोग केला असून एकूण २४ शिक्षक पदांसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्याने बारावी, आयटीआय व पदविकाधारक, पदवीधर, पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देवून प्रशिक्षण देण्याची योजना आणली आहे. कौशल्य विकास विभागाच्यावतीने ही योजना राबविली जात आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाकडून एकूण पदांच्या पाच टक्के पदे याप्रमाणे प्रशिक्षण कालावधीसाठी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येत आहे.

या योजनेत आतापर्यंत शिपाई, क्लार्क आदी पदांच्या रिक्त जागा जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी शासनाच्या पोर्टलवर कळविल्या आहेत. एक हजार पेक्षा जास्त जागा यासाठी जाहीर केल्या आहेत. मात्र, यात शिक्षक भरतीसाठी प्रथमच प्रयत्न केला जात आहे. मालवण पंचायत समितीने मालवण तालुक्यातील २४ शाळांमधील २४ उपशिक्षक, पदवीधर शिक्षक यासाठी जाहिरात काढली आहे. या जाहिरातीत त्या-त्या शाळांची नावे, तेथील मंजूर पदे, पटसंख्या, भरलेली पदे आणि भरावयाची पदे याची माहिती देतली आहे.

रिक्त पदे प्रश्न मिटणार
एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला दहा हजार रुपये, नुसता डीएड असल्यास आठ हजार रुपये असे मानधन देण्यात येणार आहे. अशाप्रकारे शिक्षक नियुक्ती दिल्याने मालवण तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न किमान सहा महिन्यासाठी मिटणार आहे. तसेच सहा महिन्यानंतर अशाप्रकारे पुन्हा भरती करून शिक्षक नियुक्ती दिली जाणार आहे.

यामुळे संभ्रम
जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगार उमेदवारांनी संघर्ष केल्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या उमेदवारांना अकरा महिन्याच्या कालावधीसाठी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचे मान्य केले आहे. यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांत समाधानाचे वातावरण होते. परंतु, अद्याप शासनाने याबाबत आदेश काढलेले नाहीत. येत्या काही दिवसांत तसा आदेश निघण्याची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर सहा महिन्यासाठी भरती सुरू झाल्याने शासनाच्या आदेशाची वाट पाहत असलेल्या उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला आहे.

या आहेत अटी
अर्जदार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असावा. असेच अर्ज ग्राहय धरले जातील. प्रशिक्षणार्थीची निवड करताना उपशिक्षक (शिक्षण सेवक) व पदवीधर शिक्षक (शिक्षणसेवक) यांना डीईडी, बीईडी गुण, टीईटी-सीटीईटी गुण यांचे गुणांकन (५०:५० टक्के) व क्लार्क (लिपिक), डाटा ऑपरेटर यांना शैक्षणिक अर्हता गुणांवर व एमएससीआयटी, टायपिंग (मराठी व इग्रजी) चे गुण याचे गुणांकन (५०:५० टक्के) च्या आधारे अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येऊन निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ही निवड केवळ प्रशिक्षणार्थी म्हणुन फक्त ६ महिन्यासाठी असल्यामुळे प्रशिक्षणार्थी यांची निवड यादी प्रसिध्द झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा हरकर्तीचा विचार केला जाणार नाही, अशा प्रकारची अट घातली आहे.

कोट
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत एकूण पदांच्या ५ टक्के पदे भरण्याचा सूचना आहेत. त्यानुसार मालवण पंचायत समितीला एकूण ३९ पदे भरावी लागणार आहेत. त्यात शिक्षकांची संख्या जास्त असल्याने मालवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला २७ पदे भरावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मंजूर पदे व रिक्त पदे याचा अभ्यास करून एकूण २४ शिक्षक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जाहिरात काढून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात २२ अर्ज आले आहेत. ते सर्व उमेदवार पात्र असल्याने त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. कुशल अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
– आत्मज मोरे, गटविकास अधिकारी, मालवण पंचायत समिती



Leave A Reply

Your email address will not be published.