किट न मिळाल्यामुळे महिला कामगार आक्रमक! महामार्ग रोखला!! |
Workers' Protest! Highway Blocked!
नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सुरक्षा साहित्याने सुसज्ज किट वाटप केले जात आहे. मात्र, आठ दिवसांपासून प्रतीक्षा करूनही किट न मिळाल्याने अखेर संतप्त महिला कामगारांनी बेला येथे भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने या किटचे वाटप एका खासगी कंपनीमार्फत करण्यात येत आहे. मात्र, वारंवार तारीख दिली जात असूनही प्रत्यक्षात किट न मिळाल्याने कामगारांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक जण रोजंदारी सोडून लांबून प्रवास करून किटसाठी येत आहेत, पण प्रत्येकवेळी त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
महिला आणि पुरुष कामगारांनी १७ तारखेला किट वाटप होईल, या आशेने रात्रीपासूनच बेला येथील लॉनबाहेर तळ ठोकला होता. काही कामगार तर दूरच्या गावांमधून आले होते आणि मुक्कामी थांबले होते. मात्र, सकाळी अचानक वाटप रद्द झाल्याचे सांगण्यात आल्याने संतप्त महिलांनी महामार्गावर ठिय्या मांडला आणि घोषणाबाजी सुरू केली.
काही महिला आपल्या लहान मुलांसह दोन दिवसांपासून येथे थांबलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. रस्त्याच्या कडेला बसून रात्र जागून काढणाऱ्या कामगारांची अवस्था दयनीय होती. किट वाटपाच्या नियोजनातील हलगर्जीपणामुळे हजारो कामगारांची गैरसोय होत असून, शासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.