खुशखबर! राज्यातील आरोग्य विभागात दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता!!
State Healthcare Services – Government Approved!!
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयापर्यंत आरोग्य सेवा सुधारण्यासाठी २,०७० नवीन पदनिर्मितीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
१३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, नव्याने स्थापन झालेल्या आणि श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. यात ८६ आरोग्य संस्थांसाठी ८३७ नियमित पदे आणि १,२३३ कुशल व अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. या आरोग्य संस्थांमध्ये ४७ उपकेंद्रे, १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५ ग्रामीण रुग्णालये, २ ट्रॉमा केअर युनिट, ४ स्त्री रुग्णालये, १० उपजिल्हा रुग्णालये आणि २ जिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने ही पदभरती करण्यात येत आहे. तसेच, टप्प्याटप्प्याने सर्व रिक्त पदे भरण्याचे नियोजन सुरू असून, त्यादृष्टीने आवश्यक पावले उचलली जातील. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे.
याशिवाय, सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी गट अ वैद्यकीय अधिकारी (MBBS) प्रतीक्षा यादीतील ४०८ आणि गट ब (BAMS) प्रतीक्षा यादीतील २५ डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि वेगवान आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.