पुणे विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन हा नवीन अभ्यासक्रम सुरु !-SPPU Temple Management Admission!
SPPUTemple Management Admission!
पुणे विद्यापीठात ‘मंदिर व्यवस्थापन’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, ६० जागांसाठी ७ एप्रिलपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. १ जुलैपासून प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात होईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ असून, ५ जूनला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान ४५% आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४०% गुण आवश्यक आहेत. मात्र, या अभ्यासक्रमासाठी कोणतीही शिष्यवृत्ती उपलब्ध नाही.
या अभ्यासक्रमात तीन महिने वर्ग शिक्षण व तीन महिने ऑन-जॉब ट्रेनिंग दिले जाणार आहे. नाशिकच्या धार्मिक महत्त्व, परिसरातील मंदिरे आणि २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. धार्मिक पर्यटन, भाविक व्यवस्थापन आणि मंदिरांचे प्रशासन या गोष्टींवर यात भर दिला जाणार आहे.
मात्र, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात असा धार्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयावर वाद होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.