आता कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती!
shikshak-bharti-news
आताच प्राप्त माहिती नुसार, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबरच डीएड व बीएड शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आता शिक्षक मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा ग्रामीण भागात असून स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमाकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. कमी विद्यार्थी असल्याने शाळा बंद करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असल्याने सरकारने २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून असावा, असे प्रयत्न सुरू होते, परंतु सेवानिवृत्तांची काम करण्याची क्षमता, तसेच दुर्गम भागामध्ये काम करण्यासाठी आड येणाऱ्या वयोमर्यादेमुळे सर्वच ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक मिळणे अवघड झाले होते.
अशा ठिकाणी शिक्षकाचे पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या उमेदवारांना संधी दिल्यास शिक्षकांची पदे रिक्त राहणार नाहीत, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही, असा विचार करून सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक अथवा डीएड व बीएड शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे ग्रामीण भागातील पालकवर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे.