आज शिष्यवृत्ती परीक्षा – २४२ केंद्रांवर ३२,९९२ विद्यार्थी
scholarship Exam on Sunday !
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग पूर्णतः सज्ज झाला आहे. पाचवीसाठी १४१ आणि आठवीसाठी १०१ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, एकूण ३२,९९२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – सकाळी ११ ते १२.३० या वेळेत भाषा आणि गणित या विषयांसाठी पेपर १ होईल, तर दुपारी २ ते ३.३० या वेळेत गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांसाठी पेपर २ घेतला जाईल.
पाचवीसाठी १४१ परीक्षा केंद्रांवर २०,१६० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सातारा २३, जावली ९, महाबळेश्वर ९, वाई ९, खंडाळा ८, फलटण २४, माण ९, खटाव १०, कोरेगाव ८, कराड १७ आणि पाटण १५ या केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. तसेच, आठवीसाठी १०१ परीक्षा केंद्रांवर १२,८३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये सातारा २०, जावली ६, महाबळेश्वर ६, वाई ५, खंडाळा ३, फलटण १३, माण ८, खटाव ९, कोरेगाव ८, कराड १४ आणि पाटण ९ अशा परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक आणि परीक्षेचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरून २४२ परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. मुख्याध्यापकांच्या लॉगिनवर सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या प्रती विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी शिक्षण विभागाने संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आणि उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी दिली आहे.