नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना वेतन दिलासा! – Salary relief for teachers!
Salary relief for teachers!
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या बालवाडी मदतनीस आणि सहाय्यक शिक्षकांना तब्बल पाच महिन्यांनंतर वेतन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेअंतर्गत महापालिकेच्या विविध शाळांमध्ये एकूण ७६ शिक्षकांची भरती करण्यात आली होती. या शिक्षकांना केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नेमण्यात आले होते, मात्र सहावा महिना सुरू होईपर्यंतही त्यांना आपले हक्काचे वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे या शिक्षकांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर ४ मार्च रोजी त्यांचे चार महिन्यांचे थकीत वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. यामध्ये बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांना प्रत्येकी सहा हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. डी.एड. व पदवीधर अर्हताधारक सहाय्यक शिक्षकांना आठ हजार रुपये, तर बी.एड. अर्हताधारक सहाय्यक शिक्षकांना दहा हजार रुपये विद्यावेतन तत्त्वावर नियुक्त करण्यात आले होते. मात्र, भरती झाल्यापासून महिन्यानंतरही वेतन मिळत नसल्याने या शिक्षकांमध्ये नाराजी होती. त्यांनी वेळोवेळी पालिकेकडे पाठपुरावा केला आणि शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे आपली व्यथा मांडली. तसेच, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात वेतनाच्या प्रश्नासोबतच महापालिकेतील शिक्षकांची कमतरता लक्षात घेऊन भविष्यातही संधी मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले होते.
या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर शिक्षकांना ४ मार्च रोजी चार महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्यात आले. मात्र, अजूनही दोन महिन्यांचे वेतन देणे बाकी असून, प्रशासनाच्या माहितीनुसार, उर्वरित वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे या शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी नियमित वेतन मिळावे, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परता दाखवावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.