नोकरीची सुवर्णसंधी !! नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग द्वारे ९७२ नवीन पदांची भरती !
Registration Department to Get 972 New Posts!
राज्यात नागरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे नोंदणी विभागावर मोठा कामाचा भार पडत आहे. दस्त नोंदणीच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, सध्याच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजात अडथळे येत होते. ही समस्या सोडवण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ९७२ नवीन पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे.
दरवर्षी महाराष्ट्रात सुमारे २५ ते ३० लाख दस्त नोंदणी केली जाते, ज्यातून सरकारला ५०,००० कोटींहून अधिक उत्पन्न मिळते. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे नोंदणी प्रक्रियेत दिरंगाई होत होती. या पार्श्वभूमीवर, नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने सध्याच्या पदसंख्येचा आढावा घेत नव्या पदनिर्मितीची गरज अधोरेखित केली.
सध्या नोंदणी व मुद्रांक विभागात ३,०९४ पदे कार्यरत आहेत, ज्यात नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, मुद्रांक जिल्हाधिकारी, सहजिल्हा निबंधक यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. नवीन प्रस्तावानुसार, नोंदणी उपमहानिरीक्षकांसाठी तीन अतिरिक्त पदे तयार करण्यात आली आहेत. तसेच, सहजिल्हा निबंधक वर्ग-१ ची पदसंख्या ५४ वरून ६६ करण्यात येणार आहे.
याशिवाय, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, दुय्यम निबंधक श्रेणी-१ आणि मुद्रांक निरीक्षक पदांमध्ये वाढ प्रस्तावित आहे. सध्या ३९४ असलेल्या दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक पदांमध्ये ८१ नवीन जागांची भर घालण्यात येणार आहे. सरकारकडून या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास, नोंदणी विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळणार आहे.