नवीन जाहिरात !! वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तब्बल ६०% रिक्त पदे भरली जाणार!

Rapid Recruitment in VNMKV!

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तब्बल 60% पदे रिक्त असून, ही भरती प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत केली. या भरतीसाठी सुधारित आकृतिबंध आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले असून, लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे.

 Rapid Recruitment in VNMKV!

रिक्त पदांमुळे विद्यापीठाचा कारभार अडखळला
विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडत आहेत. एका प्राध्यापकांकडे तीन-चार पदांचा प्रभार देण्यात आला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि संशोधनाची संधी मिळण्यात अडथळे येत आहेत. याशिवाय, कृषी विस्तार सेवा व शेतकऱ्यांसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही वेळेवर मिळत नाही.

चार वर्षांत नवीन महाविद्यालये, पण शिक्षक नाहीत!
गेल्या चार वर्षांत विद्यापीठाने चार नवीन महाविद्यालये सुरू केली आहेत, मात्र, उपलब्ध शिक्षकांची संख्या अपुरी आहे. यामुळे या महाविद्यालयांचा दर्जा घसरत असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण यांनी या प्रश्नाला विधिमंडळात वाचा फोडली आणि सरकारला विचारले की, किमान ५०% पदभरतीस परवानगी दिली जाईल का? तसेच रोस्टर मंजुरीबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे?

पदभरती प्रक्रियेसाठी तातडीची कार्यवाही
कृषिराज्यमंत्री जयस्वाल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले की, पदभरतीसाठी तातडीने सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या 2972 मंजूर पदांपैकी केवळ 1118 पदे भरलेली आहेत, तर 791 पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे 1909 पदे कार्यरत असली तरी, अनेक महत्त्वाच्या पदांवर कायमस्वरूपी नियुक्त्या नाहीत.

नवीन आकृतिबंधावर अंतिम निर्णय लवकरच
विद्यापीठातील पदभरतीसाठी पूर्वीचा 2003 मधील आकृतिबंध लागू होता, मात्र तो आता कालबाह्य झाला आहे. त्यामुळे नवीन आकृतिबंध तयार करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

शासनाचा ठोस निर्णय अपेक्षित
शेतकरी व कृषी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या या भरतीला वेग देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होते का, याकडे संपूर्ण कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, संशोधनाला चालना मिळावी आणि विद्यापीठाचा दर्जा उंचवावा, यासाठी ही पदभरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.