आनंदाची बातमी ; लवकरच प्राध्यापक भरती मंजूर, नवी प्रक्रिया!
Professor Recruitment Approved, New Process!
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, मा. राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी निवड प्रक्रियेसाठी गुणांकन प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. यात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व मुलाखतीतील कामगिरीचा विचार केला जाणार आहे. अधिक पारदर्शक व निष्पक्ष प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन व अध्यापनाला ८०% गुण आणि मुलाखतीसाठी २०% गुण देण्यात येणार आहेत. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५०% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरवले जाईल.
अध्यापन क्षमता आणि संशोधन प्राविण्याचे मुल्यमापन परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिक किंवा नवीनतम तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा याद्वारे करण्यात येणार आहे. तसेच निवड समितीच्या बैठकीचे दृक-श्राव्य चित्रिकरण केले जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे चित्रिकरण समितीच्या स्वाक्षरीनिशी सीलबंद केले जाईल.
मुलाखतीनंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ही कार्यपद्धती सर्व स्तरांवरील प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेलाही याच कार्यपद्धतीनुसार मंजुरी देण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये जलद आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबविणे शक्य होईल. या सुधारित प्रणालीमुळे गुणवत्ताधिष्ठित प्राध्यापकांची निवड होईल आणि उच्च शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.