पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती सुरु ! जाणून घ्या सविस्तर माहिती
Pavitra Portal Appointment Controversy!
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून २०१७ मध्ये निवड झालेले काही शिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. याचे कारण म्हणजे काही अपात्र उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, फेब्रुवारी २०२५ मध्ये न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात सुमारे ५ ते ७ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाने पारदर्शकता न राखता इच्छेनुसार तालुका बदल करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. ज्या तालुक्यात शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे आणि रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथे नियुक्ती करण्याऐवजी काही शिक्षकांना गोंदिया, तिरोडा आणि गोरेगाव या शहरांमध्ये नियुक्त्या दिल्या जात असल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभागाच्या या कृतीमुळे इतर शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. नियुक्ती प्रक्रियेत हस्तक्षेप करून, वाटाघाटीच्या आधारावर शिक्षकांची बदली केली जात असल्याचा आरोप होत आहे. योग्य न्याय मिळावा आणि गरज असलेल्या तालुक्यांमध्ये शिक्षकांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवरी आणि सालेकसा यांसारख्या दुर्गम भागात शिक्षक नियुक्त करण्याऐवजी, शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना शहरांमध्ये नियुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
शिक्षण विभागाने पारदर्शकता राखून गरज असलेल्या भागात नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी शिक्षक व पालक करत आहेत. अन्यथा, शिक्षकांच्या नियुक्तीप्रक्रियेबाबत अधिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.