अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अडकले, आणि ‘लाडकी बहीण’चा भत्ता गायब !
No March Salary, No Incentive: Anganwadi Workers Face Financial Strain
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मार्च महिन्याच्या वेतनासाठी एप्रिल महिना संपत आला तरी वाट पाहत आहेत. एवढेच नाही तर, ‘लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता देखील अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यात सुमारे २,२१,२६२ अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना दरमहा ठराविक मानधन दिले जाते – सेविकांना १३,००० रुपये आणि मदतनिसांना ७,००० रुपये, तसेच सेविकांसाठी मासिक २,००० रुपये आणि मदतनिसांसाठी १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता निश्चित केला आहे. मात्र, ऑक्टोबर २०२४ पासूनचा प्रोत्साहन भत्ता अद्याप दिला गेलेला नाही, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली.
‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आले. प्रत्येकी अर्जासाठी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला होता. या योजनेत महिलांना आठ हप्त्यांचे पैसे मिळाले असले तरी, हे फॉर्म भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही एक रुपयाही मिळालेला नाही. शासनाकडून योजना यशस्वी राबविल्याबद्दल कौतुक जरूर झालं, पण प्रत्यक्षात भत्ता मिळालाच नाही, ही खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सेविकांचे म्हणणे आहे की, घरखर्च, वीजबिल, कर्जाचे हप्ते, आणि मुलांचे शैक्षणिक खर्च यामुळे आर्थिक नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. यापूर्वी सात ते दहा तारखेदरम्यान मानधन जमा व्हायचे, मात्र यावेळी एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप वेतन खात्यात जमा झालेले नाही.माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मागवली असून, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा प्रोत्साहन भत्ता अदा केला जाईल, असे विभागाने स्पष्ट केले.
या सर्व प्रकारामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी वेतन आणि प्रोत्साहन भत्त्याचा तात्काळ निर्णय घेण्याची मागणी शासनाकडे केली आहे.