नेपाळी विद्यार्थ्यांना एनओसी देण्यास मनाई !
Nepali Students to Be Denied NOC !
ओडिशामधील भुवनेश्वर विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा योग्य आणि कायदेशीर तोडगा निघाला नाही, तर ओडिशात शिकण्यासाठी जाणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देणे थांबवले जाईल, असा इशारा नेपाळ सरकारने दिला आहे.
कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (केआयआयटी) मध्ये बीटेकच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या प्रकृती लामसाल हिने वसतिगृहात आत्महत्या केली. या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाहेर काढण्यात आले, त्यामुळे हा वाद आणखी चिघळला.
नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने निवेदन जारी करून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संयम बाळगावा, तसेच परिस्थिती योग्य मार्गाने सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राजनैतिक स्तरावर प्रयत्न करत आहे, असे स्पष्ट केले.
नेपाळच्या संसदेतही यावर चर्चा झाली असून, मृत्यूची गंभीर चौकशी करावी आणि नेपाळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
केआयआयटी प्रशासनाने परिस्थिती बिघडल्याने काही नेपाळी विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढून त्यांची कोणतीही प्रवास व्यवस्था न करता कटक रेल्वे स्थानकावर सोडले.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकार राजनैतिक स्तरावर काम करत असल्याचे सांगितले. बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात परतण्याचा किंवा घरी जाण्याचा पर्याय देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ही घटना पुन्हा घडू नये’
प्रकृती लामसाल हिचे वडील सुनील लामसाल भुवनेश्वर येथे पोहोचले असून, त्यांनी संस्थेने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. “मी माझी मुलगी गमावली, पण इतर अनेक नेपाळी विद्यार्थी येथे शिकत आहेत. त्यांना वसतिगृहातून बाहेर काढणे चुकीचे आहे. अशी घटना पुन्हा घडू नये,” अशी मागणी त्यांनी केली.