इतिहासात पहिल्यांदाच! MPSC मार्फत २७९५ पशुधन विकास अधिकारी पदांची भरती; या सुवर्णसंधीला जावू देऊ नका ! | MPSC Livestock Recruitment Opportunity!

MPSC Livestock Recruitment Opportunity!

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजात नवचैतन्य आणण्यासाठी आणि रिक्त पदांमुळे निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी संवर्गातील तब्बल २७९५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही राज्याच्या इतिहासात एक ऐतिहासिक भरती मानली जात आहे.

MPSC Recruitment 2025 for 2695 posts

पशुसंवर्धन सेवा गट अ मधील या पदांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना अधिक चांगल्या दर्जाची सेवा पुरवता येणार आहे. आतापर्यंत विभागात ४६८४ मंजूर पदांपैकी फक्त १८८६ पदेच कार्यरत होती. उर्वरित २७९८ पदे रिक्त असल्याने कामावर मोठा ताण येत होता. त्यातच २०२५ अखेर ८ अधिक पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार असल्याने समस्या आणखी गंभीर होणार होती.

ही गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने पुढाकार घेतला आणि पशुधन विकास अधिकारी पदांच्या भरतीसाठी MPSC ला अधिकृत मागणीपत्र सादर केले. यानंतर MPSC ने तातडीने जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून २९ एप्रिल ते १९ मे २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये फक्त पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसंवर्धन शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. गट अ संवर्गातील ही पदे असल्यामुळे पदाची प्रतिष्ठा आणि जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (https://mpsc.gov.in) संपूर्ण भरती प्रक्रियेची माहिती घेणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून पशुसंवर्धन विभागातील कामकाजावर कर्मचारी अभावाचा मोठा परिणाम होत होता. आता ही २७९५ पदे भरल्यानंतर पशुपालकांना अधिक जलद व गुणवत्तापूर्ण सेवा मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतीने राबविण्याचे निर्देश देखील सरकारकडून एमपीएससीला देण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य कागदपत्रांसह आपले अर्ज वेळेत सादर करावेत आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा!

Leave A Reply

Your email address will not be published.