लवकरच आता MPSC मार्फत रिक्त सरकारी पदांची भरती होणार ! जाणून घ्या
MPSC Recruitment Accelerated !
महाराष्ट्रातील रिक्त सरकारी पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. एमपीएससीच्या भरती प्रक्रियेला वेग मिळावा आणि पारदर्शकता वाढावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
राज्यातील विविध विभागांमधील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जातात. मात्र, या भरती प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर, विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री शेलार यांनी भरती प्रक्रियेसंबंधी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आयोगाच्या रिक्त पदांची भरती लवकरात लवकर केली जाणार असून, परीक्षेसाठी प्रतीक्षा यादी लागू करण्यासाठी आयोगाला विनंती करण्यात येईल.
राज्यातील भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि इतर राज्यांच्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी सरकार अभ्यासगट स्थापन करणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल. तसेच, न्यायालयीन प्रकरणे कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
एमपीएससीने नुकतीच २०२२ साठीची राज्यसेवा परीक्षा घेतली असून, त्यामधून ६१४ उमेदवारांची शिफारस शासनाला करण्यात आली. त्यातील ५५९ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस हजेरी लावली, तर ५५ उमेदवार अनुपस्थित राहिले. या उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या प्रयत्नांमुळे भरती प्रक्रिया अधिक प्रभावी होणार असून, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.