आता लवकरच MPSC द्वारे मेगा भरती ! – MPSC Mega Recruitment !
MPSC Mega Recruitment !
राज्यात लवकरच एमपीएससीमार्फत मोठी भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा आता यूपीएससीच्या धर्तीवर डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) स्वरूपात घेतल्या जातील आणि त्यानुसार परीक्षा व मुलाखतीचे कॅलेंडर ठरवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससीचा नवा पॅटर्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षा देतात, पण दोन्हींचा पॅटर्न वेगळा असल्याने तो एकसमान केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल.”
याशिवाय, एमपीएससी अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून, वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 ची भरती गतीने करण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एमपीएससीची पुनर्रचना येणार!
- मोठ्या प्रमाणात भरती वेगवान करण्यासाठी एमपीएससीची पुनर्रचना केली जाणार.
- आयोगातील तीन रिक्त सदस्यपदे लवकरच भरली जाणार.
- एमपीएससी स्वायत्त असली तरी सरकारची जबाबदारी असल्याने त्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू.
617 उमेदवारांची शिफारस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 12 नोव्हेंबर 2024 रोजी 617 उमेदवारांची शिफारस शासनाकडे केली होती. त्यापैकी 540 उमेदवारांची कागदपत्रे तपासून त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वर्णनात्मक पद्धतच अंतिम!
विद्यार्थ्यांमध्ये वर्णनात्मक परीक्षेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी विरोध केला असला, तरी सरकारने हा निर्णय अंतिम ठरवला आहे. “ही पद्धत अवलंबल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेतही फायदा होईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.