खुशखबर !! उच्च शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल ; आता पदवीसाठी अप्रेंटिसशिप अनिवार्य करण्यात आले !
Mandatory Apprenticeship!
भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना अधिक कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे बदल होत आहेत. विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (UGC) नुकतेच दोन मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पदवी अभ्यासक्रमात (UG) अप्रेंटिसशिप अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसेच पदवी आणि पदव्युत्तर (UG-PG) अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) अंतर्भूत करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात UGC ने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना या नवीन नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता त्यांना उद्योगजगताच्या गरजांसाठी तयार करणे हा प्रमुख उद्देश आहे. याच उद्देशाने UGC ने अप्रेंटिसशिप अनिवार्य केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगात काम करण्याचा अनुभव मिळणार असून, ते अधिक व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होतील. यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल.
नवीन नियमानुसार, तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात (BA, BSc, BCom) विद्यार्थ्यांना एक ते तीन सेमिस्टर अप्रेंटिसशिप करावी लागेल, तर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात (Honors किंवा चार वर्षीय डिग्री प्रोग्रॅम) दोन ते चार सेमिस्टर अप्रेंटिसशिपचा समावेश असेल. अंतिम सत्रात ही अप्रेंटिसशिप बंधनकारक असेल. एका विद्यार्थ्याने किमान 10 क्रेडिट मिळवण्यासाठी किमान तीन महिन्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, उच्च शिक्षण संस्थांनी (HEI) उद्योगक्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन अप्रेंटिसशिपसाठी उपलब्ध जागा निश्चित कराव्यात आणि राष्ट्रीय प्रशिक्षुता प्रशिक्षण योजनेच्या (National Apprenticeship Training Scheme – NATS) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
दुसरा मोठा निर्णय म्हणजे भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यासक्रमात समावेश. UGC च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण क्रेडिटपैकी 5% क्रेडिट भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत मिळवणे बंधनकारक असेल. उर्वरित 50% क्रेडिट मुख्य विषयांसाठी दिले जातील. याचा उद्देश प्राचीन भारतीय ज्ञान, परंपरा आणि कौशल्ये नव्या पिढीला शिकवणे हा आहे. वेद, ज्योतिष, आयुर्वेद, योग, वास्तुशास्त्र, संगीत, संस्कृत आणि अन्य पारंपरिक भारतीय विषयांना महत्त्व देण्यात येणार आहे.
भारतीय ज्ञान प्रणालीस प्रोत्साहन देण्यासाठी UGC अनेक नवीन उपक्रम राबवत आहे. विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांना यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे. संशोधन, अभ्यासक्रम आणि अध्यापन यामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीला योग्य स्थान दिले जाईल. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.
या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योगजगतात प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवता येईल. यामुळे शिक्षण अधिक व्यावहारिक होईल आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी अधिक सज्ज राहता येईल. UGC चे हे निर्णय उच्च शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणतील आणि भारतीय ज्ञान प्रणालीला नवसंजीवनी देतील.