परराज्यातून लाडकी बहीण योजनेचे बोगस अर्ज दाखल, पोलिसात गुन्हा दाखल!
Ladki Bahin Fake Applications
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधून खोटी कागदपत्रे बार्शी तालुक्यातील असल्याचे अर्जात नमूद केल्याचे २२ बोगस अर्ज पडताळणी समितीच्या निदर्शनास आले. ऑनलाइन बोगस अर्ज दाखल केलेल्या २२ अर्जदारांवर बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पंचायत समितीच्या महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण (३४, रा. बार्शी) यांनी तक्रार दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, लाडकी बहीण योजनेत बार्शी तालुक्यातून जून ते ३ ऑक्टोबरपर्यंत ८५ हजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून, त्याची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. यावेळी दाखल झालेल्या २६ व २७ जुलै रोजी दाखल झालेल्या अर्जाची पडताळणी करताना काही अर्जात रहिवासी नाव, आधार नंबर, रेशन कार्ड, मतदान कार्ड बनावट असल्याची शक्यता आहे.
शिवाय अर्जातील बैंक खात्याची माहिती घेताना खाती परराज्यातील असल्याचे बैंक अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना सांगितले. पडताळणीसाठी एक समिती गठित करून मुख्याधिकारी यांना शहरातील ५ नावे व ग्रामीण भागाचे १७ असे २२ अर्ज पडताळणीस दिले होते. पडताळणीअंती वरील अर्ज बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस तपास करीत आहेत.