विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! | Important Notice for Students!
Important Notice for Students!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आजअखेर (२४ मार्च) असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
विद्यापीठाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ (NEP) अंतर्गत बीए, बीकॉम आणि बीएस्सी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी २३ आणि २४ मार्च अशी दोन दिवसांची विशेष मुदतवाढ दिली होती. याआधी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती, मात्र अनेक विद्यार्थी अर्ज भरू शकले नव्हते.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आजच विद्यापीठाच्या प्रणालीमध्ये सादर करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त वेळ दिली जाणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बीएस्सी नियमित, बीएस्सी अॅनिमेशन, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज, बीएस्सी बायोटेक, बीएस्सी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, बीए व बीकॉम या ‘एनईपी’ आधारित अभ्यासक्रमांकरिता ही मुदत लागू राहील. मात्र, बीए, बीकॉम व बीएस्सी २०१९ पॅटर्नच्या अभ्यासक्रमांना ही मुदत लागू होणार नाही.
विद्यार्थ्यांनी अंतिम क्षणाची वाट न पाहता त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा परीक्षा संधी गमावली जाऊ शकते, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.