मोठी संधी ;आता नागपूर मधील विद्यार्थ्यांना इटलीत शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार !
Golden Opportunity for Nagpur Students to Study in Italy!!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा करार केला असून, आता अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग), आर्किटेक्चर, डिझाईन, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या पाच शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी इटालियन सरकारशी भागीदारी करण्यात आली आहे. या करारामुळे नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना इटलीतील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव संपादन करण्याची संधी मिळणार आहे.
इटालियन दूतावास आणि नागपूर विद्यापीठ यांच्यात अलीकडेच झालेल्या या करारांतर्गत ‘इन्व्हेस्ट युअर टॅलेंट इन इटली’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नऊ महिन्यांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. विशेष म्हणजे, फक्त अकादमिक शिक्षणच नव्हे, तर इटलीतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.
या अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना https://investyourtalentapplication.esteri.it/SitolYT/EN/invest-your-talent-in-italy या लिंकवर जाऊन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत हा करार करण्यात आला असून, त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांतील तसेच राज्यातील इतर काही विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना देखील या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
या संधीमुळे नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशल्ये आत्मसात करता येतील, तसेच इटलीसारख्या विकसित देशात शिक्षण आणि काम करण्याचा अनमोल अनुभव घेता येईल. हा करार केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरच्या दाराची कवाडे उघडणारा ठरणार आहे.