ICSE-ISC निकाल जाहीर झाला ! | Girls Shine Bright in CISCE!
Girls Shine Bright in CISCE!
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) आज आयसीएसई (ICSE – 10वी) आणि आयएससी (ISC – 12वी) २०२५ या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांची अधिकृत घोषणा मंडळाच्या संकेतस्थळावर results.cisce.org वर करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहेत.
या वर्षी देखील निकालात मुलींनीच आपली छाप सोडली आहे. आयसीएसईचा एकूण निकाल ९९.०९% लागला आहे, तर आयएससी परीक्षेचा निकाल ९९.०२% इतका लागला आहे. मुलींचा यशाचा टक्का दोन्ही परीक्षांमध्ये मुलांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट सर्व समाजासाठी अभिमानास्पद आहे.
आयसीएसई परीक्षेसाठी यंदा २,५२,५५७ विद्यार्थी उपस्थित होते, तर आयएससी परीक्षेसाठी ९९,५५१ विद्यार्थी बसले होते. ICSE मध्ये मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.३७% असून, मुलांचे प्रमाण ९८.८४% इतके आहे. ISC मध्येही मुलींनी बाजी मारली असून, त्यांचा यशाचा टक्का ९९.४५% आहे, तर मुलांचा ९८.६४%.
दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३३% गुण आवश्यक होते, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना ४०% गुण मिळणे गरजेचे होते. ज्यांना एक किंवा दोन विषयांमध्ये आवश्यक गुण मिळाले नाहीत, त्यांना जुलै २०२५ मध्ये सुधारणा परीक्षेत बसण्याची संधी दिली जाणार आहे.
निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी:
- अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट द्या.
- ICSE किंवा ISC निकाल या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर किंवा UID क्रमांक टाका.
- सबमिट बटणावर क्लिक करा.
- निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड व प्रिंट करून ठेवू शकता.
मुलींचा वाढता यशाचा दर शिक्षणात सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जात आहे. मुलींना उत्तम शिक्षण मिळाले तर त्या केवळ स्वतःचं नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचं भविष्य उज्वल करू शकतात, याचा उत्तम प्रत्यय या निकालातून येतो.
निकालाच्या या पर्वात यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांना संधीची वाट पहावी लागणार आहे, त्यांनाही पुढील परीक्षेसाठी खूप शुभेच्छा!