डिलिव्हरी बॉय आणि कंत्राटी कामगारांना मिळणार पेन्शन; सरकार ‘गिग’ कामगारांना देणार सुरक्षा, कशी असणार योजना?
GIG Workers Yojana
GIG Workers Yojana: हातावर पोट असलेल्या कामगारांना दिवाळीच्या आधी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ‘गिग’ कामगारांना आर्थिक सुरक्षा पुरवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ‘गिग’ कामगारांना पेन्शन आणि आरोग्यसेवा यासारखे सामाजिक सुरक्षा फायदे देण्यासाठी धोरण तयार केले जात आहे, असे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. देशात गिग अर्थव्यवस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित ६५ लाख कामगार आहेत, आणि या क्षेत्रातल्या झपाट्याने वाढीमुळे ही संख्या २ कोटींना पार करेल, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. सेवा क्षेत्र ग्राहकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर वाढवत आहे आणि यामुळे सरकार गिग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता तयार करण्यात गुंतले आहे.
Gig Worker Pension Scheme
गिग कामगार म्हणजे कंत्राटी स्वरूपात काम करणारे व्यक्ती. या कामगारांचे काम कायमस्वरीच्या कर्मचाऱ्यांऐवजी तात्पुरती किंवा कंत्राटी पद्धतीने घेतले जाते. विविध व्यवसायांमध्ये असे अनेक कामे असतात, ज्यांसाठी गिग कामगारांची भरती केली जाते. हे कामगार मुख्यतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असतात, कंत्राटी संस्थांशी संबंधित असतात किंवा इतर तात्पुरत्या कामकाजात कार्यरत असतात.
सरकार गिग कामगारांसाठी एक ठोस धोरण तयार करण्याच्या तयारीत आहे. कामगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “आम्ही गिग कामगारांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नाही. या क्षेत्रातील कामगारांसाठी एक व्यापक धोरण आवश्यक आहे.” त्यांनी यावर भर दिला की कामगार मंत्रालयाला हे धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक आहे. आगामी अर्थसंकल्पापूर्वी विविध गोष्टींसाठी योजना आखली जात आहे, असे मांडविया यांनी स्पष्ट केले.
मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन धोरण देशभरात कायदेशीर बंधनकारक असेल. त्यांनी सांगितले की, सामाजिक सुरक्षा आणि इतर फायदे प्रदान करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर तयार करण्यासारख्या विविध सूचनांवर विचार सुरू आहे. मंत्रालय सर्व सूचनांचे गंभीरपणे मूल्यांकन करत आहे. या निर्णयामुळे असंख्य तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना मोठा फायदा होईल.