नागपुरात लवकरच ३५२ फायरमॅन पदांची रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार !
Rising Fire Incidents, Fireman Recruitment Delayed!!
शहरात आगीच्या घटना वाढत असताना अग्निशमन दलात फायरमॅनची संख्या अपुरी असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागपूर शहर तर्फे मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालयात घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. २.५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फायरमॅन भरती प्रक्रियेमुळे अनेक तरुण बेरोजगार असल्याचा आरोप करत त्यांनी मनपा आयुक्त आणि प्रशासक अभिजीत चौधरी यांना घेराव घातला.
महानगरपालिकेत फायरमॅनची कमतरता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात अग्निशमन दलाचे महत्त्व अधोरेखित करत योग्य अग्निसुरक्षा आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र, नागपुरात केवळ ११ फायर स्टेशन कार्यरत आहेत, जे अपुरे आहेत. नियमानुसार, प्रत्येक २ लाख लोकसंख्येसाठी १ फायर स्टेशन असावे, यानुसार शहरात किमान २० फायर स्टेशन असायला हवे. तसेच, प्रत्येक स्टेशनसाठी तीन शिफ्टमध्ये एकूण ६० फायरमॅन आवश्यक आहेत. या हिशोबाने १२०० फायरमॅन असणे गरजेचे असताना महापालिकेत फक्त १२७ स्थायी फायरमॅन कार्यरत आहेत. त्यामुळे नागपूरकरांचा जीव धोक्यात असल्याचे शिवसेनेने निदर्शनास आणले.
भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी
उन्हाळ्यात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. मात्र, फायरमॅनची संख्या अपुरी असल्याने मोठ्या दुर्घटनांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर त्वरित भरती न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नितीन तिवारी यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातच जर अग्निशमन दलात मोठी कमतरता असेल, तर सामान्य नागरिकांचे रक्षण कोण करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
३५२ फायरमॅन पदभरती रखडली
२०२३ पासून ३५२ फायरमॅन पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे. ७००० हून अधिक स्थानिक युवक-युवतींनी अर्ज केले होते, मात्र प्रक्रिया पुढे सरकली नाही. भरती लांबणीवर पडल्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याची बाब शिवसेनेने अधोरेखित केली. तसेच, भरती त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र
महापालिका निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असल्या तरी स्थानिक मुद्द्यांवर राजकीय पक्षांची आंदोलने वेग घेत आहेत. फायरमॅन भरतीचा मुद्दा मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरत असून, शिवसेनेने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनात दीपक कापसे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम कापसे, शहर प्रमुख आशिष हडगे, जिल्हा चिटणीस अब्बास भैय्या, विभागीय सचिव अपूर्वा पित्तलवार, मुन्ना तिवारी यांच्यासह असंख्य युवक-युवती सहभागी झाले होते.