बनावट ई-चलनाने नागरिकांची मोठी फसवणूक – सावध राहा! | Fake E-Challan Scam!
Fake E-Challan Scam!
सायबर चोरट्यांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी आता नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिसांच्या नावाने बनावट ई-चलन पाठवून वाहनचालकांची फसवणूक केली जात आहे. या फेक मेसेजमध्ये अत्यंत अधिकृत वाटणाऱ्या वेबसाईटच्या लिंक्स देऊन नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. विशेष म्हणजे, हे बनावट चलन ग्रामीण भागातही झपाट्याने पोहोचत असून अनेक लोक या सायबर जाळ्यात अडकत आहेत.
गेल्या काही वर्षांत वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन दंड भरण्याची सुविधा दिली आहे. अधिकृत ई-चलनाद्वारे वाहनचालकांना त्यांच्या वाहनावरील दंड भरता येतो. परंतु आता सायबर गुन्हेगारांनी याच संधीचा गैरफायदा घेत, खोट्या वेबसाइट्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर “तुमच्या गाडीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. पुढील २४ तासांत दंड भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. पेमेंटसाठी खालील लिंकवर क्लिक करा.” असा मेसेज पाठवला जात आहे.
या बनावट मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताच अधिकृत सरकारी वेबसाईटसारखी दिसणारी बनावट वेबसाइट उघडते. या फेक वेबसाइट्सवर सुरक्षेसाठी लॉक चिन्ह (🔒) देखील दाखवले जाते, त्यामुळे त्या पाहताना खऱ्याच वाटतात. महत्त्वाचे म्हणजे, mahatrafficechallan.in किंवा pune-trafficpay.com यांसारख्या फेक लिंकचा वापर करून फसवणूक केली जाते. या संकेतस्थळांवर ‘दंड भरा’ हा पर्याय दिला जातो, जिथे नागरिकांना कार्ड डिटेल्स, यूपीआय माहिती, मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकायला सांगितले जाते.
एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हजारो रुपये गमावत आहेत. काही घटनांमध्ये तर एका क्लिकमध्ये ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम चोरीला गेल्याचे आढळले आहे. पुण्यातील सौरभ गंगावणे या युवकाने आपल्या अनुभवाबद्दल सांगितले, “माझ्या गाडीवर ई-चलन असल्याचा मेसेज आला. त्यातील लिंकवर क्लिक करून मी यूपीआय डिटेल्स भरले. ओटीपी टाकताच माझ्या बँक खात्यातून १७,००० रुपये डेबिट झाल्याचे नोटिफिकेशन आले. चौकशी केल्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.”
यासंदर्भात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळाशिवाय कुठल्याही तृतीय पक्षाच्या (थर्ड पार्टी) लिंक्सवर क्लिक करू नका. वाहतूक विभागाकडून व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे ई-चलन पाठवले जात नाही. त्यामुळे असे मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
खऱ्या चलनाची खात्री करण्यासाठी अधिकृत https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या वाहनाचा नंबर टाकून तपासणी करावी. जर कोणतीही शंका वाटत असेल, तर थेट स्थानिक वाहतूक शाखा किंवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सावध राहा, सुरक्षित राहा!