पालकांची विनंती “परीक्षा लवकर घ्या, गावी जाऊ द्या!”?-Exams or Hometown?
Exams or Hometown?
राज्य सरकारच्या ‘एकत्रित परीक्षा’ निर्णयामुळे अनेक पालक अडचणीत आले आहेत. मुंबई आणि उपनगरांतील अनेक शाळांमध्ये पालक रेल्वेची आरक्षित तिकिटं हातात घेऊन शाळांमध्ये धाव घेत आहेत आणि मुख्याध्यापकांना हात जोडून विनंती करत आहेत – “परीक्षा लवकर घ्या, गावी जाऊ द्या!”
खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये परीक्षेचं वेळापत्रक आधीच ठरलेलं होतं – १० किंवा ११ एप्रिलला परीक्षा संपणार होती. त्यामुळे अनेकांनी त्यानुसार रेल्वे तिकिटंही आधीच काढली होती. पण आता एससीईआरटीने ८ ते २५ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याचा आदेश दिल्यामुळे आरक्षित तिकिटं असूनही गावी जाता येणार नाही, अशी वेळ पालकांवर आली आहे.
एका घरात एक मूल खासगी शाळेत आणि दुसरं विनाअनुदानित शाळेत असलं, तर एकाच घरातील वेगवेगळ्या परीक्षांच्या तारखा गावच्या योजनांवर पाणी फिरवत आहेत.
बोरिवली, भांडुप, दादर, मुलुंड या भागांतील शाळांमध्ये कोकण किंवा उत्तर भारतात जाणाऱ्या पालकांनी अशीच तगमग व्यक्त केली. कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेस किंवा वाराणसीच्या गाड्यांची तिकिटं आधीच काढली असली, तरी आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे ती वापरता येणार नाहीत, ही खंतही पालकांमध्ये आहे.
मुख्याध्यापकांकडे विनवण्या सुरू असून, शाळांनाही ‘ही शासकीय पातळीवरची बाब आहे’ असं सांगून पालकांची समजूत काढावी लागते आहे.