धनगर, धनगड एकच; सरकार काढणार नवीन महत्वाचा GR!
dhangar dhangad new GR 2024
धनगर आणि धनगड एकच आहेत असा स्वतंत्र जीआर राज्य सरकार लवकरच काढणार आहे. हा जीआर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठी जीआरचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती येत्या चार दिवसांत जीआरचा मसुदा तयार करेल.
त्यानंतर राज्याचे महाधिवक्त्यांचे यावर मत घेतले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे. हा समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल, सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, आदिवासी विकाससह संबंधित अन्य विभागांचे सचिव, समन्वय समितीच्या सदस्यांचा सहभाग घेऊन तातडीने कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
अहवाल देण्याचे निर्देश: धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या समावेशाबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉ. सुधाकर शिंदे समितीलाही लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले.