विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी !! मुंबई वडाळा येथे ६ मार्च रोजी रोजगार मेळावा आयोजित ; संधीचा लाभ घ्यावा !
Career Guidance and Job Fair on March 6 at Wadala!!
मुंबई शहर आणि उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण कार्यालयामार्फत ६ मार्च २०२५ रोजी करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, विद्यालंकार मार्ग, वडाळा (पू.), मुंबई-३७ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य मनिषा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या मेळाव्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील संधी याविषयी तज्ज्ञ समुपदेशकांकडून मार्गदर्शन (करिअर टॉक) दिले जाईल. तसेच, १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
मेळाव्यादरम्यान, विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध उद्योग व संस्थांकडून थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, पात्र ठरलेल्या उमेदवारांना तुरळक जागांवर प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र (Appointment Letter) देखील दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या वतीने करण्यात आले आहे.