ई-मंत्रिमंडळाची सुरुवात!-Cabinet Launched!
Cabinet Launched!
राज्य सरकारनं डिजिटल इंडिया मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे – ‘ई-मंत्रिमंडळ’! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं असून, नागरिक सेवा अधिक प्रभावी आणि तंत्रस्नेही करण्याचा सरकारचा मानस आहे.
यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी लागणारे कागद-पत्र, अजेंडा आणि निर्णय एका क्लिकवर मंत्र्यांच्या iPadवर उपलब्ध असतील. त्यामुळे आता कागदं वाटायला, प्रिंट काढायला किंवा फाईल सांभाळायला वेळ वाया जाणार नाही!
मंत्र्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांकडून ई-ऑफिस प्रणालीचा वापर होत असून, सरकारने आधीच ‘आपले सरकार’, ‘डिजिटल सुशासन निर्देशांक (DGGI)’, ‘सेंट्रल रजिस्ट्री युनिट’ अशा अनेक योजना राबवल्या आहेत.
गेल्या चार वर्षांपासून आमदार-खासदार टॅबलेटवरच काम करत आहेत. आता ‘ई-मंत्रिमंडळ’मुळे मंत्रिमंडळाच्या कामकाजात वेग, पारदर्शकता आणि सहजता येणार आहे. बैठकीदरम्यान आलेले अडचणीचे मुद्देही लगेचच सामावून घेता येतील.
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे, आता मंत्र्यांना iPad वापरून कुठूनही बैठक घेता येणार, योजनांचा आढावा घेता येणार आणि सरकारी अॅप्लिकेशनसुद्धा सहज चालवता येणार.
महाराष्ट्र हे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश यांच्यानंतर सातवे राज्य ठरणार आहे जे ‘ई-कॅबिनेट’ प्रणाली वापरणार आहे. यामुळे महाराष्ट्राचं प्रशासन आणखी स्मार्ट आणि लोकाभिमुख होणार, हे नक्की!