केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा झाली, पण शिक्षक कुठे आहेत?
Budget announced, but where are the teachers?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील पाच वर्षांत ७५ हजार जागा वाढवण्याची घोषणा केली. मात्र, सध्याच्या स्थितीत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तब्बल ४१ टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास नवीन शिक्षक कुठून येणार, हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यातील ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांची एकूण ४०३८ पदे मंजूर आहेत. मात्र, यातील २३८० पदे रिक्त आहेत. ही पदे कधी भरली जाणार, याचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
एमबीबीएसच्या ९०० जागांची वाढ
राज्यात यंदा १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू झाली आहेत. यामध्ये १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली ८ महाविद्यालये आणि प्रत्येकी ५० जागांची २ महाविद्यालये समाविष्ट आहेत. त्यामुळे राज्यातील एमबीबीएसच्या ९०० जागांची वाढ होणार आहे.
रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज
वैद्यकीय शिक्षण खात्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मदतीने सुमारे १ हजार शिक्षकांची पदे भरण्याचे नियोजन केले आहे. हे शिक्षक मे २०२५ पर्यंत रुजू होतील, असा अंदाज आहे. तोपर्यंत कंत्राटी आणि पदोन्नतीद्वारे शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ही पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. समीर गोलावार यांनी व्यक्त केले.