“घोषणा मोठ्या, पण शिक्षक नाहीत!”
"Big Announcements-But No Teachers!"
केंद्रीय बजेटात तर घोषणा झाली, पण मेडिकल कॉलेजांत शिक्षक राहिले कुठं?… तब्बल ४१ टक्के जागा रिक्त! केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच बजेट सादर केलं. त्यात त्यांनी मेडिकल कॉलेजांमध्ये पुढच्या पाच वर्षांत ७५ हजार जागा वाढवायचं सांगितलं.
पण बघा ना, राज्यातल्या शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये आधीच ४१ टक्के शिक्षकांची पदं रिक्त आहेत. आता विद्यार्थी वाढले, तर शिकवायला नवे शिक्षक येणार कुठून, हा प्रश्न तसाच राहिला.
महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज असावं. त्यामुळे नवीन कॉलेज सुरू होतच राहिली. राज्यात सध्या ३५ सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलं आहेत. पण यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक मिळून तब्बल २,३८० जागा रिकाम्या आहेत.
ही रिकामी पदं सरकार भरत का नाही? हा प्रश्न कोणी विचारत नाही. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
एमबीबीएसच्या ९०० जागा वाढल्या
राज्यात यंदा १० नवीन सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलं सुरू झालीत. यापैकी आठ कॉलेजांत १००-१०० विद्यार्थी आणि दोन कॉलेजांत ५०-५० विद्यार्थी क्षमता आहे.
वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार म्हणतात, “नवी महाविद्यालयं सुरू होणं चांगलंय, पण विद्यार्थी दर्जेदार शिक्षण मिळवतील का? यासाठी रिक्त पदं ताबडतोब भरायला हवीत.”
शासनानं मे २०२५ पर्यंत १ हजार शिक्षक भरती करायचं ठरवलंय. पण तोपर्यंत काय? म्हणून काही शिक्षक कंत्राटी आणि पदोन्नतीद्वारे नियुक्त करण्यात आलेत.