नगर जिल्हा बँक भरती घोटाळा उघड! | Bank Recruitment Scam!

Bank Recruitment Scam!

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या भरती परीक्षेच्या निकालावर मोठा वाद उफाळून आला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने थेट घोटाळ्याचा आरोप करत सोशल मिडियावर राजकीय खळबळ माजवली आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) हँडलवरून पोस्ट शेअर करत या कथित घोटाळ्यासाठी काही प्रमुख राजकीय नेत्यांना टॅग करून प्रश्न उपस्थित केले आहेत.

 Bank Recruitment Scam!

परीक्षेची पारदर्शकता धोक्यात
समितीच्या मते, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. यामुळे पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जर सर्व काही नीट आणि नियमबद्ध असेल, तर निकालातील नावांची यादी का लपवली जातेय, असा सवाल अभ्यासू युवांमध्ये उपस्थित झाला आहे.

“तेरी भी चूप, मेरी भी चूप” – राजकीय संनाटा!
या घोटाळ्यावर ना सत्ताधारी काही बोलत आहेत, ना विरोधक. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार, काही जिल्हा बँका विरोधकांच्या ताब्यात असल्याने एकमेकांच्या पापावर झाकून ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच या गंभीर विषयावर कोणीही आवाज उठवत नाहीये. यात भरडले जात आहेत ते गरिब आणि प्रामाणिक मेहनतीने अभ्यास करणारे उमेदवार.

“१५ लाख कुठून आणायचे?” – युवांचा संताप
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी या प्रकारामुळे मानसिक त्रास होतोय. अनेक जण म्हणत आहेत, ‘आमच्याकडे कोणतेही राजकीय बळ नाही, पैसे नाहीत, आम्ही फक्त मेहनतीवर विश्वास ठेवतो. पण जर १५ लाख रुपये देणाऱ्यांनाच जागा मिळणार असतील, तर आमच्या मेहनतीचे काय?’ हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

सरकारवर ताशेरे, परीक्षा घेणे बंद करा!
समितीने थेट राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटले, “जर असा गैरप्रकार करणार असाल, तर परीक्षा घेऊच नका. निदान हजारो युवांचे वर्ष तरी वाचेल. केवळ पैसेवाल्यांचीच निवड करायची असेल तर परीक्षांचे ढोंग कशाला?” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

आमदार रोहित पवार यांना थेट टॅग
या प्रकरणात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने थेट आमदार रोहित पवार यांच्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले, “आपण ज्या जिल्ह्याचे आमदार आहात, तिथल्या जिल्हा बँकेत इतका मोठा घोटाळा झालाय. आपण विरोधक म्हणून आवाज उठवायला हवे. यावर लक्ष द्या.”

परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर आणि सरकारी भरती प्रक्रियेवर सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत होतो आहे. ज्यांना प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवायची आहे, अशा उमेदवारांसाठी ही अवस्था अत्यंत निराशाजनक आहे.

पारदर्शक चौकशीची मागणी
या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, निवड प्रक्रियेत पारदर्शकता हवीच, अन्यथा यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा विश्वासार्ह राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.