महत्वाचं!-‘अनुकंपा’साठी दुसऱ्या वारसदाराचे नाव देता येते! – Anukampa Name Proposal
Anukampa Name Proposal Update
अनुकंपा धारक उमेदवारांसाठी एक महत्वाचा अपडेट, अनुकंपा नोकरीसाठी ४५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या एखाद्या वारसदाराच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराचा अनुकंपा नोकरीच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाचा निर्णय देताना स्पष्ट केले. हा निर्णय अनुकंपा उमेदवारांसाठी नक्कीच महत्वाचा आहे. चला तर जाणून घेऊया या संदर्भातील पूर्ण माहिती..
न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे कार्यरत वनरक्षक अकबर खान मो. खान पठाण यांचा १२ फेब्रुवारी २०१६ रोजी अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा मो. जुबेर खान यांचा अनुकंपा नोकरीच्या यादीत समावेश केला गेला होता. मात्र त्यांना प्रदीर्घ काळ नोकरी देण्यात आली नाही. दरम्यान, अनुकंपा नोकरी मिळवण्यासाठी निश्चित करण्यात आलेली ४५ वर्षांची वयोमर्यादा त्यांनी ओलांडली. त्यामुळे त्यांनी बहिणीला नोकरी मिळण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी अर्ज केला होता. २० मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तो अर्ज अमान्य करण्यात आला. त्याविरुद्ध मो. जुबेर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मो. जुबेर यांच्या मागणीवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने वन विभागाला दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली.