MPSC निकाल प्रक्रियेचा खेळखंडोबा! – हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात; वेळेत निकाल लागण्यासाठी कालमर्यादा लावण्याची मागणी विधानसभेत घोंगावली! | MPSC Result Delayed, Students’ Future in Limbo!

MPSC Result Delayed, Students’ Future in Limbo!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. निकाल वेळेवर लागत नसल्यामुळे उमेदवारांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. UPSC जिथे २० दिवसांत निकाल जाहीर करते, तिथे MPSC महिन्यानु महिने निकाल प्रलंबित ठेवते, ही गंभीर बाब आज विधानसभा सभागृहात आमदार हेमंत रासणे यांनी उचलून धरली.

MPSC Result Delayed, Students’ Future in Limbo!

रासणे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांनुसार, जनवारी २०२३ मध्ये सुरू झालेली गट-क लिपिक व टंकलेखक पदभरती प्रक्रिया अद्याप जुलै २०२५ पर्यंतही पूर्ण झालेली नाही. ही भरती जवळपास ७००७ पदांसाठी होती, आणि दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरीही निकालाचा पत्ता नाही. यामुळे उमेदवारांच्या मनात मोठी नाराजी पसरली आहे.

पुण्याचा कसबा मतदारसंघ, जो ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखला जातो, तिथे शेकडो अभ्यासिका आणि हजारो स्पर्धा परीक्षार्थी दिवस रात्र परिश्रम घेत असतात. मात्र, योग्य वेळी निकाल न लागल्यामुळे अनेकजण मानसिक तणावात जातात, तर काहीजण शिक्षण आणि तयारीमधूनच बाहेर पडतात. हे चित्र केवळ पुण्यापुरते मर्यादित नसून, संपूर्ण राज्यभरातील परीक्षार्थ्यांसाठी ते दुःखद वास्तव ठरत आहे.

रासणे यांनी MPSC साठी निश्चित कालमर्यादा बंधनकारक करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी असेही सुचवले की, UPSC च्या धर्तीवर ‘प्रतिभा सेतू’ पोर्टल, पारदर्शक वेळापत्रक, उत्तरदायित्व निश्चित करणारी समिती किंवा लोकपाल, तसेच विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय आणि कायदेशीर सल्ला केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे. या उपाययोजनांमुळे परीक्षार्थ्यांना दिशा मिळेल, असे त्यांनी मत मांडले.

या मुद्द्यावर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देताना सांगितले, की टंकलेखक निकालाची प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालयाच्या अधिकृत आदेशाची प्रत मिळताच शासन सकारात्मक निर्णय घेईल, आणि निकाल प्रक्रिया गतीने मार्गी लावली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये उमेद जागी झाली असली तरी MPSC वरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्वरित व ठोस निर्णय आवश्यक आहे. निकाल वेळेवर न लागल्यास परीक्षार्थींच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे वाया जातात, ही बाब शासनाने गांभीर्याने घ्यावी.

स्पर्धा परीक्षांचा केंद्रबिंदू बनलेल्या महाराष्ट्रात, विद्यार्थ्यांचे स्वप्न, परिश्रम आणि वेळ यांचा आदर राखला गेला पाहिजे. त्यासाठी MPSC ला सुधारित कार्यपद्धती आणि निश्चित वेळापत्रक पाळणे अत्यावश्यक आहे, यावर आजच्या चर्चेने शिक्कामोर्तब केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.