अकरावीची यादी आज!-FYJC List Out Today!
FYJC List Out Today!
अकरावीच्या केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची यादी आज (२६ जून, गुरुवार) संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे. या यादीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २७ जून ते ३ जुलै या काळात संबंधित कॉलेजात आपला प्रवेश पक्का करायचा आहे. पहिल्या फेरीनंतर उरलेल्या जागांची यादी ५ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे.
दहावीचा निकाल यंदा थोडा कमी लागलाय. त्यामुळे अकरावीचा कट ऑफ सुद्धा थोडा घसरू शकतो, असं बोललं जातंय. राज्यभर यंदा ऑनलाइनेच प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज भरायची मुदत ७ जूनपर्यंत होती. त्या दरम्यान राज्यात १२ लाख ७१ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. नाशिक विभागातच १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, नाशिक जिल्ह्यात ६० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
११ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी लागली आणि तब्बल १४ दिवसांनी आता पहिली फेरी लागतेय. इनहाऊस, मॅनेजमेंट आणि अल्पसंख्याक कोट्याच्या जागांसाठी १२ ते १४ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वेळ दिली होती. त्यामध्ये १,५९८ विद्यार्थ्यांनी जागा निश्चित केली आहे.
नाशिक विभागात जवळपास ८०० कॉलेजेस आहेत आणि पावणेदोन लाख जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, नाशिक विभागात ९३.०४ टक्के. गेल्यावर्षीच्या ९५.२८ टक्के निकालाच्या तुलनेत यंदा थोडी घट झाली आहे. त्यामुळेच यावर्षीच्या अकरावी कट ऑफमध्ये घसरण होण्याची दाट शक्यता आहे.