आनंदाची बातमी !! PM KISAN २० वा हप्ता जूनमध्ये मिळणार ! | PM Kisan Installment in June!
PM Kisan Installment in June!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा एप्रिल ते जून या तिमाहीचा २० वा हप्ता येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांची कागदपत्रे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जिल्ह्यात २२,२७८ शेतकरी विविध त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहणार असल्याचे समोर आले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ३१ मेपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
ई-केवायसी आणि आधार सिडिंगसाठी विशेष मोहीम
शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खात्यांचे आधार सिडिंग आणि भूमी अभिलेख अद्ययावत करणे ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून चेहरा किंवा अंगठा स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच, महा ई-सेवा केंद्र आणि कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधूनही ही सुविधा मिळू शकेल.
फेरफार पोर्टलद्वारे नव्याने नोंदणीची संधी
नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी फेरफार पोर्टलवर आवश्यक माहिती अपलोड करावी. त्यामध्ये शेतजमिनीची मालकी, बँक खाते तपशील आणि आधार कार्ड यांचा समावेश असावा. तसेच, महा ई-सेवा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
‘नमो शेतकरी’चे लाभही मिळणार एकत्र
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनाचाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ३१ मे ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी.
प्रलंबित बाबींची संपूर्ण यादी
जिल्ह्यातील प्रलंबित बाबींचा आढावा घेतला असता, खालील मुद्दे अधोरेखित झाले आहेत:
- ई-केवायसी प्रलंबित: ६,३७१
- आधार सिडिंग प्रलंबित: ११,६१९
- नमो शेतकरी योजना प्रलंबित: १,३६६
- भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत: २,४९३
- नव्याने नोंदणी: ४२९
बँक खाते अद्ययावत करा, लाभ मिळवा!
लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा किंवा पोस्टात डीबीटी खाते उघडावे. जेणेकरून लाभाची रक्कम थेट खात्यात जमा होईल.
कृषी विभागाचे आवाहन: अंतिम मुदतीपूर्वी पूर्तता करा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कोणत्याही त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहू नये म्हणून ३१ मेपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.