मेगाभरती !! राज्यात २,७९५ पशुधन विकास अधिकारी पदांची भरती सुरु ! | Livestock Officer Mega Recruitment!
Livestock Officer Mega Recruitment!
राज्यातील पशुसंवर्धन विभागात ऐतिहासिक बदल होत असून, या विभागाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तब्बल २,७९५ पशुधन विकास अधिकारी पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. ही भरती गट-अ संवर्गातील असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.
सध्या जिल्हा परिषद व राज्य शासन अशा दोन वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत पशुसंवर्धन सेवा पुरविली जाते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तर राज्य शासनाच्या यंत्रणेत जिल्हास्तरीय पशुसंवर्धन उपायुक्त कार्यरत असतात. मात्र या यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे या यंत्रणांचा एकत्रितीकरण करत नवीन प्रणाली स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसली तरी, हजारो रिक्त पदे भरण्याच्या निर्णयामुळे पुनर्रचना लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि समन्वयात्मक होण्याची अपेक्षा आहे. भरतीनंतर प्रत्येक पशुवैद्यकीय केंद्रात एक अधिकारी नियुक्त होणार आहे, ज्यामुळे गावोगावी सेवा पोहोचणे अधिक सुलभ होईल.
या भरतीत दिव्यांग उमेदवारांसाठी ११२ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यात कर्णबधिर, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अंधत्व, आम्लहल्लाग्रस्त तसेच स्वमग्नता ग्रस्त अशा विविध श्रेणींतील दिव्यांगांचा समावेश आहे. संस्थात्मक व संस्थाबाह्य अनाथ उमेदवारांसाठीही २८ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत, हे विशेष आहे.
२९ एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mpsconline.gov.in) जाऊन अर्ज भरावा. अर्जाची अंतिम तारीख १९ मे २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३९४ रुपये, तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, अनाथ व दिव्यांगांसाठी २९४ रुपये आहे.
शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराकडे भारत सरकारमान्य विद्यापीठाची पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा खुल्या गटासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस व अनाथांसाठी ४३ वर्षे, माजी सैनिक व इतर सवलतींसाठी शासन नियमानुसार सवलत देण्यात आली आहे.
या भरतीच्या माध्यमातून पशुवैद्यकीय केंद्रांचे श्रेणीवर्धन होणार आहे. श्रेणी २ मधील केंद्रांना श्रेणी १ चा दर्जा देण्यात येणार असून, तेथे पशुधन विकास अधिकारी नियुक्त केले जातील. यामुळे गावातील पशुपालकांना जलद व दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यानिहाय रिक्त पदांच्या जागा भरल्यास अतिरिक्त ९० अधिकाऱ्यांची नियुक्ती शक्य होणार आहे.
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून आपले करिअर सुरक्षित करावे. पशुसंवर्धन क्षेत्रात नोकरीची ही सुवर्णसंधी असून, सरकारच्या सुधारित धोरणामुळे विभागात लवकरच आमूलाग्र बदल पाहायला मिळतील.