महावितरण पेपर पद्धतीत अचानक बदल!-Mahavitaran’s Sudden Shift!
Mahavitaran's Sudden Shift!
महावितरणनं २०२३ मध्ये ‘विद्युत सहाय्यक’ भरतीसाठी जाहिरात दिली होती. हजारो मुलांनी अर्ज भरले आणि दोन वर्षं अभ्यास सुरू ठेवला. पण आता परीक्षा अगदी डोक्यावर असताना—२० मेपासून सुरु होणाऱ्या परीक्षेला अवघे काही दिवस राहिलेले असतानाच—महावितरणनं पेपरची पद्धतच बदलून टाकली आहे.
पूर्वी ११० गुणांचं ‘तांत्रिक विषय ज्ञान’ विचारलं जाणार होतं, आता ते फक्त ५० गुणांचं केलंय! शिवाय पेपरला दोन तासांचा वेळ होता, तो आता फक्त ७५ मिनिटांचा केला गेलाय. हे सगळं इतकं अचानक झाल्यामुळे राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलंय.
पूर्वीच्या जाहिरातीनुसार १५० गुणांचे १३० प्रश्न असणार होते. त्यात ५० प्रश्न तांत्रिक, ४० तर्कशक्ती, २० संख्यात्मक, आणि २० मराठी होते. आता नवीन जाहिरातीत फक्त २५ तांत्रिक प्रश्न दिले जाणार आहेत आणि एकूण वेळ कमी केल्यामुळे सगळ्यांचं गणितच गडबडून गेलंय.
ही भरती ‘विद्युत सहाय्यक’ पदासाठी होती—तीही कंत्राटी ३ वर्षांसाठी. पण पुढे चांगली कामगिरी दाखवल्यास कायमपद मिळू शकतं म्हणून बरेच जण खूप मेहनत घेत होते. दीड-दोन वर्षं प्रामाणिकपणे अभ्यास केल्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावर नियम बदलले गेले, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलंय.
विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, “दोन वर्षं आम्ही ११० गुणांच्या अभ्यासक्रमावर मेहनत घेतली. आता अचानक पेपर बदलला म्हणजे आमचं नुकसान नाही का? हे असं का केलं, त्याचं उत्तर अजून महावितरणकडून मिळालेलं नाही.”