तरुणांना पंतप्रधान इंटर्नशिप अंतर्गत देशातील ५०० टॉप कंपनी मध्ये काम करण्याची संधी!-PM Internship Opportunity!

PM Internship Opportunity!

पंतप्रधान इंटर्नशिप योजना २०२५ ही केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

PM Internship Opportunity!

ही योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये देशभरातील १.२५ लाख युवकांना पायलट प्रोजेक्टच्या स्वरूपात सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांत या योजनेचा विस्तार करून एक कोटी तरुणांना संधी देण्याचा सरकारचा मानस आहे.

या योजनेच्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये १२ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, HCL टेक्नॉलॉजीज, ICICI बँक, HDFC बँक, NTPC, IOCL, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा स्टील यांसारख्या नामवंत कंपन्यांचा समावेश आहे.

इंटर्नशिपदरम्यान उमेदवारांना दरमहा ₹५,००० इतके मानधन दिले जाईल आणि एकवेळ ₹६,०००चा लाभ देखील मिळेल, जो प्रवास, निवास किंवा अन्य खर्चासाठी उपयोगी ठरतो. याशिवाय, एकूण प्रशिक्षण कालावधीपैकी किमान ५०% वेळ हा प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात काम करत घालवावा लागेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना अकादमिक शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळेल.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २१ ते २४ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदार भारताचा नागरिक असावा, कोणत्याही प्रकारच्या पूर्णवेळ नोकरीत किंवा नियमित शिक्षणात सामील नसावा. अर्जदाराने १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी (BA, B.Sc, B.Com, BBA, BCA, B.Pharma) पूर्ण केलेली असावी. त्याचप्रमाणे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असावे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य कायम सरकारी नोकरीत असू नये.

विशेष बाब म्हणजे या योजनेसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे माफ आहे. कोणत्याही प्रकारचा नोंदणी किंवा प्रोसेसिंग फी घेतला जात नाही. अर्जदारांनी अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन आपले वैयक्तिक, शैक्षणिक व कौटुंबिक माहिती भरावी लागते, तसेच आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार/पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इ.) अपलोड करावी लागतात.

योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता २२ एप्रिल २०२५ करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र तरुणांनी संधी दवडू नये आणि वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.