रेल्वे भरतीत मोठी संधी ;112 लोको पायलट पदांसाठी अर्ज मागवले!-112 Loco Pilots Hired!
112 Loco Pilots Hired!
रेल्वेमध्ये इंजिन चालवणाऱ्या लोको पायलटांवर खूप मोठी जबाबदारी असते. पण या पदांमध्ये भरतीचा मुद्दा २०१९ पासूनच रखडलेला होता. अखेर भुसावळ रेल्वे मंडळानं विभागीय निवड प्रक्रियेतून ११२ सहायक लोको पायलटांची भरती करून हा जुना प्रश्न मार्गी लावला आहे.
ही भरती इतक्या लवकर पूर्ण करणारे भुसावळ हे पहिले रेल्वे मंडळ ठरलं आहे. आता या नव्या उमेदवारांच्या हाती इंजिनची जबाबदारी देण्यात येणार आहे. सुरुवातीला ही भरती फक्त टीआरएस (TRS) विभागातल्या तंत्रज्ञांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे ३१ मे २०२३ रोजी जरी १७५ जागांसाठी अधिसूचना काढली गेली तरी त्यात फक्त दोन उमेदवारांचीच निवड झाली.
ही अडचण लक्षात घेऊन भुसावळ मंडळाने रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ८ एप्रिल २०२४ रोजी रेल्वे मंडळानं शिथिलता देऊन सर्व विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना अर्जाची मुभा दिली. यानंतर १६ मे रोजी नव्याने अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि इंजिनिअरिंग, सिग्नल-टेलिकॉम, ऑपरेटिंग, इलेक्ट्रिकल, टीआरडी अशा विभागातून ९२३ अर्ज आले.
२८ जुलै २०२४ रोजी परीक्षा झाली, ज्यातून १६१ उमेदवार उत्तीर्ण झाले. लगेचच वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान मनोवैज्ञानिक चाचणी झाली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या १३९ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी झोनल ट्रेनिंग सेंटरला पाठवण्यात आलं. हे प्रशिक्षण १ एप्रिल २०२५ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झालं.
३ एप्रिल रोजी ११२ सहायक लोको पायलटांना नियुक्ती पत्र देण्यात आलं. यानंतर भुसावळ मंडळ प्रशिक्षण केंद्रात या नव्या उमेदवारांसाठी ओळख सत्र (Orientation Session) घेण्यात आलं. यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अपर व्यवस्थापक सुनील सुमन, वरीष्ठ अभियंते आणि ऑपरेशन अधिकारी हे उपस्थित होते.