PSI परीक्षेचा निकाल रखडला!-PSI Result Delayed
PSI Result Delayed
खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची भरती प्रक्रिया रखडल्याने परीक्षार्थी आणि सेवा बजावत असलेले पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
८ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० डिसेंबर २०२३ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य परीक्षा झाली. मात्र, मुख्य परीक्षेला तब्बल तीन महिने उलटून गेले असूनही अद्याप अंतिम निकाल जाहीर झालेला नाही.
आयोगाकडून मुख्य परीक्षेची दुसरी उत्तरतालिका प्रसिद्ध झाली असली तरी, निकालाचा पत्ता नाही. परिणामी, मैदानी चाचणीसाठी तयारी करत असलेले अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
“नोकरी सांभाळत आम्ही दोन वर्षांपासून तयारी करत आहोत. आम्हाला तयारीसाठी इतर उमेदवारांप्रमाणे वेळ मिळत नाही. निकालाची वाट पाहायची की पुढील परीक्षेसाठी तयारी करायची?” – असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
आजवर दोन वर्षे लोटली असून, भरती प्रक्रियेचा वेग अत्यंत मंद आहे. निकाल जाहीर करणे आणि तत्परतेने मैदानी चाचणी आयोजित करणे, ही लोकसेवा आयोगाची जबाबदारी आहे. हा उशीर परीक्षा दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, असा आरोपही काहींचा आहे.
सर्व परीक्षार्थींनी आयोगाकडे मागणी केली आहे की, निकाल तातडीने जाहीर करावा आणि भरती प्रक्रिया पूर्ण करावी.