आनंदाची बातमी !! मराठवाडा विद्यापीठात ७३ प्राध्यापक पदांची भरती !
73 Professor Posts!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शिक्षक श्रेणीतील ७३ जागांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. इच्छुक उमेदवार २ एप्रिल ते २ मे या कालावधीत केंद्र सरकारच्या ‘समर्थ पोर्टल’द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
विद्यापीठामध्ये एकूण २८९ शिक्षक पदे मंजूर आहेत, मात्र सध्या फक्त १३० शिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित १५९ रिक्त पदांपैकी ७३ पदे भरण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्यावेळी ५,८१५ ऑनलाईन अर्ज आणि ४,६०० हार्डकॉपी अर्ज प्राप्त झाले. मात्र, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने जुलै २०२५ मध्ये ही भरती प्रक्रिया रद्द केली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पुन्हा पदभरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि अखेर मार्चमध्ये या पदांसाठी मान्यता मिळाली. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भरती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यामध्ये ८ प्राध्यापक, १२ सहयोगी प्राध्यापक आणि ५३ सहाय्यक प्राध्यापक पदांचा समावेश आहे.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया केंद्र शासनाच्या ‘समर्थ पोर्टल’वरून करण्यात येणार असून, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मे आहे. तसेच, अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत जमा करावी, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे.
संवैधानिक पदांच्या भरतीलाही गती
विद्यापीठातील १६ संवैधानिक पदांपैकी फक्त ४ पदे पूर्णवेळ भरलेली असून, उर्वरित १२ पैकी १० पदांसाठी अर्ज छाननी पूर्ण झाली आहे. यात ६ संवैधानिक पदे आणि ४ अधिष्ठाता पदांचा समावेश आहे. स्थगित झालेल्या या भरती प्रक्रियेला आता नव्याने प्रारंभ झाला आहे.
पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी कुलसचिव पदासाठी, तर २ मे रोजी परीक्षा व मूल्यमापन संचालक पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.