पीक विमा भरपाई ची शेतकऱ्यांना प्रतीक्षा ; कधी मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Crop Insurance Update!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे पीक विम्याच्या भरपाईबाबत शासनाने आदेश दिला आहे. मात्र, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जीआर काढून पाच दिवस झाले असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सुट्ट्यांमुळे प्रक्रिया रखडली
राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याचा आदेश दिला होता. मात्र, बँकांना १ एप्रिलपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे काही ठिकाणी हा हप्ता विमा कंपन्यांकडे पोहोचला नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, दोन दिवसांत विमा कंपन्यांना सर्व निधी मिळेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल.
काही जिल्ह्यांमध्ये भरपाई प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवसांत प्रक्रिया सुरू होईल. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा झालेली असेल. विमा कंपन्यांनीही या प्रक्रियेला दुजोरा दिला आहे.
२२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या पीक विमा भरपाईतून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. धुळे, नंदूरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली येथील शेतकऱ्यांना या भरपाईचा लाभ होणार आहे.
अग्रिम भरपाईत अडचणी
राज्यातील यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रिम भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली होती. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात विमा कंपनीने अधिसूना फेटाळली, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळणार नाही. पण नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमधील १८.८४ लाख शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांना किती मिळणार विमा भरपाई?
खरिप २०२४ हंगामासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग या चार ट्रिगरअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. एकूण २,३०८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यातील ७०६ कोटी प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या १८.८४ लाख शेतकऱ्यांना मिळतील, तर १.४८ लाख शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून १४१ कोटी रुपये मिळणार आहेत.
पूर्वीच्या हंगामातील भरपाईही प्रलंबित
खरिप २०२३ हंगामासाठी १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ हंगामासाठी ६३ कोटी, तसेच खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ साठी २.८७ कोटी रुपये भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाने संबंधित विमा कंपन्यांना लवकरात लवकर ही रक्कम वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार?
राज्य शासन आणि विमा कंपन्या भरपाईच्या प्रक्रियेला वेग देण्याचे प्रयत्न करत आहेत. येत्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. मात्र, शेतकऱ्यांना खरोखरच ही मदत वेळेत मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.