लाडकी बहीण योजनेत तब्बल १५,००० महिलांचे अर्ज रद्द ! जाणून घ्या सविस्तर
15K Applications Rejected in Ladki Bahin Yojana!
राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेत पात्रता तपासणी सुरू आहे. सरकारच्या नियमानुसार, फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात तब्बल १५,००० महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.
कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अर्ज बाद
तपासणी दरम्यान स्पष्ट झाले आहे की, अनेक अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळे बाद झाले आहेत. आवश्यक पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्जही नामंजूर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील ६१ महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत, असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
लाभासाठी वाट पाहणाऱ्या महिलांची चिंता वाढली
एकीकडे लाडकी बहिणींना दरमहा २१०० रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे छाननी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात अर्ज नामंजूर होत आहेत. त्यामुळे लाभ मिळण्यास विलंब होत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे.
राज्यभरात अर्ज फेटाळण्याचे प्रमाण वाढतेय
फक्त रायगडच नव्हे, तर राज्यभरात लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. मात्र, सखोल तपासणीत पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असून, अपात्र अर्जांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक महिलांना अपेक्षित लाभ मिळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सरकारने आता अर्जदार महिलांना आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास दुरुस्तीची संधी द्यावी, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.