नोकरीची संधी !! जामखेड पंचायत समितीत तब्बल 126 पदे रिक्त! जाणून घ्या अधिक माहिती
126 Vacancies in Jamkhed Panchayat Samiti!
जामखेड पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे प्रशासन याच समितीतून चालते. मात्र, सध्या समितीतील तब्बल 126 पदे रिक्त असल्याने प्रशासनावर मोठा ताण येत आहे.
तालुक्यातील 13 विभागांमध्ये पदे रिक्त असून, एका बाजूला वाढती बेरोजगारी आणि दुसऱ्या बाजूला अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तातडीने या रिक्त जागा भराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
रिक्त पदांमुळे सेवा विस्कळीत
यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने प्रशासनावर आधीच मोठा भार आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला असून, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात 53, आरोग्य विभागात 9 आणि ग्रामपंचायतींत 15 जागा रिक्त आहेत. तसेच कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जलसंधारण अधिकारी, उपअभियंता आणि गटशिक्षणाधिकारी यांसारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे.
रिक्त पदांची माहिती:
- पंचायत समिती विभाग: कृषी अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक, ग्रामपंचायत अधिकारी (15)
- आरोग्य विभाग: औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका
- पशुसंवर्धन विभाग: पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी
- शिक्षण विभाग: गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, विस्तार अधिकारी शिक्षण, मुख्याध्यापक, शिक्षक (प्राथमिक व पदवीधर)
- बांधकाम विभाग: जलसंधारण अधिकारी, स्थापत्य सहायक, अनुरेखक
- पाणीपुरवठा विभाग: उपअभियंता, शाखा अभियंता
- एकात्मिक बाल विकास प्रकल्प: बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस (एकूण 32)
तातडीने भरतीची गरज!
तालुक्यातील प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पडावे आणि नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.