सांगली-मिरजेत पोलिसयंत्रणा सज्ज! – Police on High Alert in Sangli-Miraj!
Police on High Alert in Sangli-Miraj!
औरंगजेबच्या कबरीच्या हटविण्याच्या मागणीवरून नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली आणि मिरजसह संपूर्ण जिल्ह्यात संवेदनशील भागांत तसेच मंदिरे आणि प्रार्थनास्थळांजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत.
नागपूरमधील परिस्थिती आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी सांगलीतील शंभर फूट रस्ता आणि विश्रामबाग भागात पोलिसांनी संचलन केलं. यात शहर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटांत वाद झाला, ज्यामुळे दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली. त्यानंतर सांगली शहरासह जिल्ह्यात पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले. रात्रीपासून संवेदनशील भागांत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आगामी रंगपंचमी, रमजान ईद आणि गुढीपाडवा यानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सांगली व मिरज शहर पोलिसांनी गारपाट चौक, शंभर फूट रस्ता आणि इतर महत्त्वाच्या भागांत गस्त वाढवली आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे आणि उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच विश्रामबाग पोलिसांनी लक्ष्मी नारायण कॉलनी आणि समर्थ मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
मिरजेत कडेकोट पोलिस बंदोबस्त
मिरज: नागपूरमधील दंगलीनंतर राज्यातील संवेदनशील शहरांमध्ये बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना गृहखात्याने दिल्या आहेत. त्यामुळे मिरज शहरात पोलिसांनी कडक उपाययोजना केल्या आहेत. मिरजेत पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली एक सहायक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, वीस पोलिस कर्मचारी, तीस होमगार्ड आणि एसआरपीएफच्या एका तुकडीची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंदिरे आणि प्रार्थनास्थळांजवळ पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात आहेत. मिरज शहर पोलिसांनी उपद्रवी व्यक्तींवर करडी नजर ठेवली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरभर पायी गस्त सुरू केली आहे.
मिरज शहरात पोलिसांचे संचलन
मंगळवारी संध्याकाळी मिरज शहर पोलिस ठाण्यापासून मिशन चौकपर्यंत पोलिसांनी संचलन केलं. या संचलनात पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते.
…तर गुन्हे दाखल होतील – पोलिस अधीक्षक घुगे
नागपूरमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शांतता कमिट्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, अन्यथा त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.
मिरज शहरात पोलिसांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलं असून, कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असं काही घडलं तर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी स्पष्ट केलं.