लाडकी बहिणींची फसवणूक? सरकारवर तीव्र टीका!-Betrayal of Women Government Under Fire!
Betrayal of Women Government Under Fire!
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या गाजावाजासह जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी मोठा आधार ठरेल, असे भासवण्यात आले होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेतील निधीत तब्बल १० हजार कोटींची कपात करण्यात आली आहे.
यामुळे योजनेतून अनेक लाभार्थ्यांना वगळले जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष नसीमा शेख यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर महिलांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप केला आहे.
निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने, प्रत्यक्षात कटौती
राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात अर्थसंकल्पात यातील १० हजार कोटींची कपात करण्यात आली आहे. तसेच, सरकारने योजनेशी संबंधित नवीन लाभ किंवा सवलती जाहीर केल्या नाहीत.
महिला मतदारांची मोठी फसवणूक?
महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळावा म्हणून निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर ते वाढवून २१०० रुपये करण्याचेही सांगितले होते. तसेच, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ यासारखी अनेक वचनं दिली होती. मात्र, अर्थसंकल्पात यापैकी कोणत्याही आश्वासनांचा उल्लेख नाही.
संघटनेच्या राज्य सचिव प्राची हातिवलेकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, “महिलांच्या भावनांशी खेळून, सत्ता मिळवल्यावर सरकारने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. या विश्वासघाताविरोधात संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे.”
महिला संघटनांचा लढा तीव्र होणार
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने राज्य सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत महिलांच्या फसवणुकीविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सरकारने महिलांना दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावीत, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेच्या नेत्या प्राची हातिवलेकर यांनी दिला आहे.