महत्वाची बातमी !! MPSC ची दिरंगाई! राज्यसेवा जाहिरात अजूनही नाही!!
MPSC Delay! State Service Ad Yet to Come!!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2025 च्या तात्पुरत्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, मार्च महिना उलटला तरीही अद्याप जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी चिंतेत आहेत. मागील काही महिन्यांपासून आयोगाच्या नियोजनातील ढिसाळपणामुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीस विलंब, विद्यार्थ्यांची चिंता वाढली
MPSC ने 2025 पासून मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या स्वरूपात अभ्यासाला सुरुवात केली आहे. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात जानेवारीत येणे अपेक्षित होती, मात्र दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असूनही काहीच हालचाल नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक गणित बिघडले आहे.
राजपत्रित अधिकारी होण्याचे स्वप्न धोक्यात
MPSC च्या अंदाजित वेळापत्रकानुसार राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी प्रस्तावित आहे, आणि त्यानंतर 2026 च्या जानेवारीत निकाल अपेक्षित आहे. या परीक्षेद्वारे 35 पदांसाठी भरती होणार आहे. मात्र, जाहिरात न आल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे.
नॉन-क्रिमीलेयरची मर्यादा संपण्याची शक्यता
मराठा, मराठा कुणबी, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र, या प्रमाणपत्राची वैधता 31 मार्चला संपणार आहे. जर त्याआधी जाहिरात आली नाही, तर अनेक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एमपीएससीकडून कोणताही प्रतिसाद नाही
आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, चार दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार आणि MPSC दोघांचेही दुर्लक्ष होत असल्याची भावना उमटत आहे.
MPSCच्या या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आयोगाने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची चिंता दूर करावी, अशी मागणी होत आहे.