३१ मार्च पर्यंत , ई-केवायसी करणे आवश्यक नाही तर , रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता!!
Ration for Six Lakh People May Be Stopped!!
राज्यात बनावट रेशनकार्डधारक व अपात्र लाभार्थी शोधून त्यांना वगळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून ही शेवटची संधी आहे. सोलापूर शहरातील १ लाख आणि ग्रामीण भागातील ५ लाख लोकांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. जर ३१ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर १ एप्रिलपासून या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे.
राज्य शासनाने अंत्योदय योजनेतील महिलांसाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येकी एक साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, सोलापूर शहरातील ६००० महिलांना आणि ग्रामीण भागातील ४९,१०३ महिलांना रेशन दुकानातून नवीन साडी मिळणार आहे. मात्र, अजून साड्यांचे वाटप झालेले नाही.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, रेशन दुकानातून धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याने ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. सोलापूर शहरातील ४.२५ लाख व्यक्तींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी ग्रामीण भागातील १८.३० लाख लाभार्थ्यांपैकी ५ लाखाहून अधिक जणांनी अद्याप प्रक्रिया केलेली नाही. विशेषतः पाच वर्षांखालील मुले आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या ई-केवायसीमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने ३१ मार्च ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. त्या पूर्वी ई-केवायसी न केल्यास १ एप्रिलनंतर स्वस्त धान्य मिळणार नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे आणि अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी नागरिकांना मुदतीच्या आत ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाने लाभार्थ्यांसाठी “मेरा ई-केवायसी” अॅप तयार केले आहे, ज्यामुळे घरी बसून मोबाईलवरूनही ई-केवायसी करता येईल. तसेच, रेशन दुकानांमधूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. मुदत संपल्यानंतर कोणतीही संधी दिली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी वेळेत ई-केवायसी करून आपले रेशन कायम ठेवावे.