मुंबई विद्यापीठ उन्हाळी परीक्षा वेळापत्रक जाहीर – Mumbai University Summer Exam Time-Table
Mumbai University Summer Exam Schedule!
मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, बीएससी आणि बीएच्या परीक्षा २६ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहेत, तर बीकॉमच्या परीक्षा १८ मार्च २०२५ रोजी सुरू होतील. तसेच, बीएससी आयटी, स्वयं-वित्तपुरवठा वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम, बीएमएम आणि बीएएमएमसी यांसारख्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील २६ मार्चपासून सुरू होतील.
विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयांनी दिलेल्या लॉगिन तपशीलाद्वारे आपली प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतात. महाविद्यालयांनी हॉल तिकिटांवरील माहितीची पडताळणी करणे आवश्यक असून, कोणतीही त्रुटी आढळल्यास त्वरित विद्यापीठाला कळवावी, असे परीक्षा विभागाने सूचित केले आहे.
विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार, सात जिल्ह्यांतील ४३९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार असून, यामध्ये एकूण १ लाख ३८ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये १४,७२३ विद्यार्थी कला शाखेचे, ७४,४८३ विद्यार्थी वाणिज्य शाखेचे, २७,१३४ विद्यार्थी विज्ञान शाखेचे, १३,०४ विद्यार्थी तंत्रज्ञान शाखेचे आणि ८,७२५ विद्यार्थी कायदा शाखेचे आहेत.
विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांच्या परीक्षेच्या तपशीलवार तारखा पाहण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर भेट देता येईल. यासाठी होमपेजवरील “परीक्षा” विभागात जाऊन, उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला विषय आणि अभ्यासक्रम निवडावा. संबंधित वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल, ते डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेण्याचा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.